प्रयागधाम फाट्याजवळ डॉक्टरचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी ; उरूळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल…

उरूळी कांचन (ता. हवेली) : प्रयागधाम फाट्याजवळील इनामदारवस्ती परिसरात एका डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात पाच अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील फिर्यादी विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय – डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असून, दि. १० जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.२० वाजल्यापासून ते १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादी डॉक्टर, त्यांचे चालक राजू राजगुरू व मदतनीस पूजा बचाटे हे प्रयागधाम फाट्याच्या पुढे इनामदारवस्ती परिसरातून जात असताना पांढऱ्या रंगाच्या एर्टीगा कारने रस्ता अडवून पाच अनोळखी इसमांनी तिघांचे अपहरण केले. आरोपींनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत फिर्यादीस मारहाण केली, तसेच त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या सहकाऱ्यांसह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर तिघांना ताब्यात ठेवून १९ लाख रुपये रोख स्वरूपात जबरदस्तीने स्वीकारण्यात आले.
या प्रकरणी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात गु.र. नं. ०९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.११ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे करीत असून, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
Editer sunil thorat



