मतदार ओळखपत्र नसेल तरी मतदानाचा हक्क अबाधित ; १२ ओळखीच्या पुराव्यांपैकी एक दाखवून करता येणार मतदान…

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदार ओळखपत्र (Voter ID) नसले तरी पात्र मतदारांना मतदान करता येणार असून, राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक छायाचित्रयुक्त पुरावा सादर केल्यास मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानासाठी पात्र मतदारांनी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, काही मतदारांकडे अद्याप मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्याने त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पर्यायी ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.
मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास पासपोर्ट, आधार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्रयुक्त ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्र असलेले पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रयुक्त दिव्यांग दाखला, मनरेगा योजनेअंतर्गत दिलेले छायाचित्रयुक्त जॉब कार्ड, निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या विधवा व अवलंबितांचे छायाचित्रयुक्त निवृत्तीवेतन कागदपत्रे, लोकसभा व राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा व विधान परिषद सचिवालयाने सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिकांचे छायाचित्रयुक्त ओळखपत्र तसेच केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रयुक्त कार्ड या पुराव्यांचा समावेश आहे.
लोकशाही प्रक्रियेत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, कोणत्याही पात्र मतदाराने मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपली आहे. जाहीर प्रचार बंद असला तरी उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवार पाचपेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक स्वरूपात मतदारांशी संवाद साधू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मतदारांनी शांततेत व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Editer sunil thorat



