सहकार चळवळीमुळे महाराष्ट्र समृद्ध : साहेबराव खामकर…

तुळशीराम घुसाळकर
हवेली (पुणे) : सहकार चळवळीमुळे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास घडून आला असून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी केले.
सहकार भारतीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. या वेळी आबासाहेब शिंगोटे, शहाजीराव बोरुडे, नवदीप सोशल फाउंडेशनचे सचिव प्रताप खामकर, प्रा. गहिनीनाथ हुमे, रविंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
खामकर पुढे म्हणाले की, सहकारामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. मात्र सहकार क्षेत्रातील काही त्रुटी दूर करण्यासाठी सहकार भारतीचे “बिना संस्कार, नही सहकार” हे ब्रीदवाक्य प्रभावीपणे रुजविण्याची आज नितांत गरज आहे.
यावेळी रावळगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सहकार क्षेत्रातील उद्योग व्यावसायिक पद्धतीने चालविण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच साखर उद्योगावरील काही बाबींमध्ये सरकारकडून नियंत्रण शिथिल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे महानगर साखर कारखाना प्रकोष्ठ समन्वयक बाळ भिंगारकर यांनी प्रास्ताविक करत सहकार भारतीच्या कार्याचा आढावा घेतला. वाय. जी. पवार यांनी मनोगतातून सहकारामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या संसाराला मोठा आधार मिळाल्याचे नमूद केले.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार नवीन सहकार धोरण आणत असून, या समितीमध्ये सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांचा समावेश झाल्याबद्दल साहेबराव खामकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर पुणे जिल्हा पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख विनोद अष्टुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Editer sunil thorat



