राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्ती किती शक्तिशाली, गतिमान व प्रभावशाली आहे हे समजते ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील…

डॉ. गजानन टिंगरे
इंदापूर (पुणे) : राजमाता जिजाऊ यांचा इतिहास जरी थोडासा वाचला तरी मनामध्ये धैर्य निर्माण होते. त्यांच्या कार्यातून स्त्रीशक्ती किती शक्तिशाली, गतिमान आणि प्रभावशाली असू शकते, हे स्पष्टपणे दिसून येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिवभक्त परिवार इंदापूर व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव यांचे थेट १६ वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव तसेच इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट १३ वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक होणार, ही दृढ संकल्पना मनात ठेवून त्यांना घडविले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाचा पुढाकार घेतला. महिलांनी आणि मुलींनी आयुष्यात संघर्ष किंवा संकटांच्या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांची आठवण केल्यास निश्चितच त्या प्रत्येक अडचणीवर मात करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिजाऊंनी आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात संस्कारांची परंपरा निर्माण केली असून, महिला प्रभावी नेतृत्व करू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण त्या आहेत, असेही ते म्हणाले.
स्वामी विवेकानंद हे युवकांचे आदर्श असून त्यांनी तत्त्वज्ञान, हिंदुत्व व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून बलशाली, स्वाभिमानी युवाशक्ती घडवली, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी वीरपत्नी गौरी अशोक इंगवले यांना मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व आजी-माजी सैनिक, एस.पी.आर.एफ. व सी.आर.पी.एफ. जवानांच्या माता व पत्नींचे जिजाऊ पूजन शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या वतीने करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव म्हणाले की, प्रत्येकालाच वाटते आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण त्याआधी प्रत्येक घरी राजमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत. श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर यांनी महापुरुषांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात लोकशाही पद्धतीने जगत आहोत. त्यामुळे राष्ट्र प्रथम हा विचार मनात ठेवून महापुरुषांची विचारधारा आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष व समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंचा संघर्ष, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले कौशल्याधिष्ठित शिक्षण तसेच स्वामी विवेकानंद यांनी युवकांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इतिहासातील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना सद्य परिस्थितीत योग्य दिशेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, वीरपत्नी हेमलता बाबुराव साबळे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, नगरसेवक अनिल पवार, माजी नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रय अनपट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलफले सर व नितीन भोसले यांनी केले, तर बापू जामदार यांनी आभार मानले.
Editer sunil thorat






