राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा काउंटडाऊन सुरू ; आज होणार मोठी घोषणा?
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष ; जिल्हा परिषद निवडणुकांचा फैसला आज?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, आज पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणाच्या मुद्द्यामुळे रखडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणूक प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली होती. न्यायालयाने आयोगाला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मंजूर केली होती. ही मुदत आज संपत असल्याने, आजच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत, तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे, त्या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, जालना, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असल्याने, निवडणूक प्रक्रियेला कायदेशीर अडथळा राहिलेला नाही.
यासोबतच, या १२ जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्याही निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक वेळापत्रक, आचारसंहिता लागू होण्याची तारीख, नामांकन प्रक्रिया, मतदान व मतमोजणीचा कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष आजच्या घोषणेकडे लागून राहिले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेचे स्पष्ट चित्र समोर येणार असून, आजचा दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Editer sunil thorat



