सभेतील टाळ्या आणि पेटीतील मतं का बदलतात? निकालामागची निवडणूक सायकॉलॉजी उलगडली… वाचा सविस्तर…

पुणे : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सभांना मिळणारी गर्दी, टाळ्यांचा कडकडाट आणि सोशल मीडियावर दिसणारा उत्साह पाहून अनेकदा एखादा उमेदवार सहज जिंकणार, असा अंदाज बांधला जातो. मात्र निकालाच्या दिवशी हेच अंदाज सपशेल फसतात. प्रचारात दिसणारं वातावरण आणि प्रत्यक्ष मतदानातून उमटणारा कौल यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक का पडतो, यामागे मतदारांची एक वेगळीच मानसिकता कार्यरत असते.
टाळ्या ‘विकासा’साठी, पण मत ‘भावने’साठी…
सभेत नेता रस्ते, शाळा, पाणी, वीज अशा विकासकामांचा पाढा वाचतो, तेव्हा जनता मनापासून टाळ्या वाजवते. मात्र मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसमोर उभा राहिल्यावर मतदाराच्या डोक्यात विकासापेक्षा ‘आपला माणूस’, ‘आपली जात’, ‘आपला परिसर’ किंवा ‘समोरचा जिंकल्यास होणारा धोका’ या भावना अधिक प्रभावी ठरतात. विकासाचं कौतुक होतं, पण मत देताना नातेसंबंध आणि भावनिक गणितच जड ठरतं.
‘बोलके’ समर्थक आणि ‘सायलेंट’ मतदार…
रॅलीत झेंडे घेऊन नाचणारे, जोरजोरात घोषणा देणारे समर्थक वातावरण तापवतात. मात्र निकाल ठरवतो तो शांत, अबोल मतदार. हा मतदार कोणत्याही सभेत जात नाही, पोस्टर लावत नाही, सोशल मीडियावर मत व्यक्त करत नाही. तो गेल्या पाच वर्षांत स्वतःला काय मिळालं, काय गेलं आणि भविष्यात सुरक्षितता कुठे आहे, याचा शांतपणे विचार करून मतदान करतो. सभेतील गर्दी पाहून त्याचा निर्णय ओळखणं अशक्यच असतं.
शेवटच्या ४८ तासांचा निर्णायक प्रभाव…
प्रचार थांबल्यानंतरही पडद्यामागे सुरू असलेला ‘अदृश्य प्रचार’ निकालाचं चित्र बदलतो. या टप्प्यात विकासकामांचा हिशेब नसतो, तर भीती आणि आमिषाचं गणित असतं. “तो जिंकला तर तुमचं काय?” हा एक प्रश्न अनेक विकासकामांवर भारी पडतो आणि मतदाराचा कल बदलतो.
इव्हेंट आणि रिअॅलिटीमधील फरक. ..
मोठ्या सभा म्हणजे अनेकदा एक इव्हेंट असतो. त्यात काही लोक तमाशा पाहण्यासाठी, तर काही उत्सुकतेपोटी येतात. टाळ्यांचा कडकडाट हा त्या क्षणाचा उत्साह असतो, ठोस पाठिंबा नव्हे. मतदानाच्या दिवशी हा उत्साह विरतो आणि प्रत्यक्ष जमिनीवरची जात, समीकरणं, समीपता आणि भीती यावर आधारित गणितच निर्णायक ठरतं.
हवेवर नाही, हिशोबावर लढली जाणारी निवडणूक…
निवडणूक ही भावना, भीती आणि वैयक्तिक हितसंबंधांच्या हिशोबावर लढली जाते. भाषणावर टाळ्या वाजवणारा मतदार हा नेत्याचा चाहता असू शकतो, पण तोच मत देईल याची हमी नसते. भारतीय लोकशाहीत मतपरिवर्तन हे प्रगती पाहून कमी, तर संभाव्य ‘धोका’ ओळखून अधिक होत असल्याचं वास्तव पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे.
Editer sunil thorat



