पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) लागू…
२२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी; शस्त्रे, मिरवणुका व घोषणांवर निर्बंध...

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ (Bombay Act No. XXII of 1951) मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, फेकावयाची हत्यारे, तलवारी, भाले, काठ्या, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच, कोणत्याही व्यक्तीचे किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे किंवा छायाचित्रांचे प्रदर्शन व दहन, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे, सभ्यता व नीतिमत्तेला धक्का पोहोचेल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा स्वरूपाची आवेशपूर्ण भाषणे, कृती किंवा साहित्य तयार करून त्याचा प्रसार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे
कलम ३७ (३) अन्वये पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव, तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, मिरवणूक किंवा आंदोलन काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील कर्मचारी तसेच कर्तव्य बजावताना अधिकृत परवानगीने शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



