
लोणी काळभोर (ता. हवेली) : येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय एकनाथ काळभोर (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. १४) दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लोणी काळभोरसह परिसरातील शेती, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दत्तात्रय काळभोर हे शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे, प्रयोगशील आणि मेहनती शेतकरी म्हणून परिचित होते. पारंपरिक शेतीसोबतच नव्या पद्धती स्वीकारून त्यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला होता. शांत, संयमी स्वभाव आणि सहकार्याची भावना यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते.
कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. गावातील विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम तसेच सामूहिक निर्णयप्रक्रियेत ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने गावाने एक अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांचे ते वडील होत. तसेच साधना बँकेचे संचालक सुभाष आप्पा काळभोर यांचे ते चुलतभाऊ होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. १४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat



