लोणीकंद, वाघोली व लोणीकाळभोर हद्दीतील अवैध दारू व जुगार अड्डे उध्वस्त; गुन्हे शाखा युनिट–६ ची धडक कारवाई…

पुणे : आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार गुन्हे शाखेकडील विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. याच अनुषंगाने मागील आठवड्यात गुन्हे शाखा युनिट–६ च्या पथकाने लोणीकंद, वाघोली व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध परिसरात अवैध दारू अड्डे व जुगार अड्ड्यांवर एकामागोमाग एक छापे टाकून प्रभावी कारवाई केली आहे.
या कारवाईत अवैध दारू अड्डे उध्वस्त करताना वाघोली येथील आव्हाळवाडी रोड परिसरातून सुरेखा दिनेश नानवत (वय ३०) हिच्या ताब्यातून ६५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत ६,५०० रुपये आहे. तसेच केसनंद येथील जाधव वस्ती परिसरातून वेंकटप्पा बिचप्पा गौड (वय ५१) याच्या ताब्यातून १०० लिटर तयार ताडी जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे ७,५०० रुपये आहे. पिंपरी सांडस येथील मुकुंद रघुनाथ निकाळजे (वय ५०) याच्या ताब्यातून ४,७४० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे जुगार अड्ड्यांवरही कारवाई करताना शिरसवाडी येथील बालाजी निसर्ग सोसायटी परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त करण्यात आला. याठिकाणी सुनील रामधन राठोड (रायटर), संजय विलास चांदणे (खेळी) आणि दगडू शिवराम वाघमारे (मालक) हे जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १२,०५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय लोणीकाळभोर हद्दीत करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत बसवराज इरप्पा रामपुरे, निलेश सुरेश फुलपगर, सचिन बाबुराव काळभोर (मालक), रमेश वसंत बामणे आणि गणेश नारायण सोनवणे हे जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून एकूण १२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही सर्व कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे–२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व गुन्हे शाखा युनिट–६ च्या पथकाने यशस्वीपणे केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



