२५० कि.मी. प्रवास करून अवघ्या ८ तासांत १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा छडा ; लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पथकाने कर्तव्यतत्परता दाखवत १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा अवघ्या ८ तासांत छडा लावत मुलीला सुखरूपपणे शोधून काढले. यासाठी पोलिसांनी तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करत उस्मानाबाद जिल्ह्यातून मुलीचा शोध घेतला.
दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ११ वाजता, तक्रारदार महिला आपल्या सोसायटीतील सेक्युरिटी केबिनची साफसफाई करत असताना तिची नात – पीडित १३ वर्षीय मुलगी केबिनबाहेर थांबलेली होती. काम आटोपून बाहेर आल्यानंतर मुलगी दिसून न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, मुलगी न सापडल्याने रात्री सुमारे १० वाजता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपासात तक्रारदाराकडून अधिक माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामधून पीडित मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
क्षणाचाही विलंब न करता लोणी काळभोर पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करून तात्काळ उस्मानाबादकडे रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत अवघ्या ८ तासांत पीडित मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलीला सुरक्षितपणे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणून तिच्या आजीच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
१३ वर्षीय मुलीचा २५० कि.मी. अंतर पार करत अत्यंत कमी वेळेत शोध घेऊन तिला सुरक्षित परत आणत लोणी काळभोर पोलिसांनी गांभीर्य, संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, मदतनीस पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, तसेच पोलीस हवालदार वणवे, कुलकर्णी आणि मपो हवालदार निकुंबे यांनी मोलाची भूमिका बजावली.
Editer sunil thorat



