तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा दणका कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी १३ प्राथमिक शिक्षक निलंबित ; ५३ जणांची चौकशी सुरू…

कोल्हापूर : राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय लाभ लाटणाऱ्यांविरोधात राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी कडक भूमिका घेतल्याने शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन प्राथमिक शिक्षकांच्या निलंबनानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी ५३ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांतील आरक्षण, विविध सवलती, आर्थिक लाभ आणि योजनांचा गैरवापर केला जात असल्याचे प्रकार समोर येत होते. यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत असल्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी सचिव तुकाराम मुंढे यांनी थेट दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
रत्नागिरीत तडकाफडकी निलंबन…
या आदेशांनंतर कोकण विभागात कारवाईला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील महावीर मिसाळ, प्रदीप मोरे आणि राजेश भंडारे या तीन प्राथमिक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे व विविध भत्त्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये शारीरिक व्यंगाचे टक्केवारीपेक्षा जास्त प्रमाण दाखवण्यात आल्याचे आढळून आल्याने या तिघांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.
कोल्हापुरात मोठी कारवाई…
याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंगळवारी (ता. ६) १३ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चौकशीत या शिक्षकांनी सीपीआर रुग्णालयासह इतर वैद्यकीय संस्थांकडून मिळवलेली दिव्यांग व आजार प्रमाणपत्रे चुकीची असल्याचे निष्पन्न झाले.
सोयीच्या ठिकाणी बदली, सवलती व इतर लाभ मिळवण्यासाठी या प्रमाणपत्रांचा वापर केल्याची चर्चा होती. काही शिक्षकांनी राजकीय दबावाचा वापर केल्याचीही कुजबूज होती. यामुळे जिल्ह्यातील ३५५ शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये २६ शिक्षक दोषी, ३०२ शिक्षकांचे अहवाल योग्य, तर ५३ शिक्षकांचे अहवाल अद्याप तपासणीखाली आहेत.
१३ शिक्षक दोषी, पंचायत समितीत हजेरी…
प्राथमिक चौकशीत दोषी ठरलेल्या १३ शिक्षकांना निलंबित करून त्यांना जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे शिक्षक भुदरगड, राधानगरी, कागल, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील असल्याची माहिती आहे.
आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात…
दरम्यान, आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात असून सीपीआर रुग्णालयाच्या नेत्रविभागाने दिलेले त्यांचे नमुने मुंबईतील जे. जे. आणि ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांची प्रतीक्षा असून ते प्राप्त होताच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिक्षण खात्यात खळबळ…
या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण खात्यात खळबळ उडाली असून, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे लाभ घेणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Editer sunil thorat



