
हडपसर, पुणे : विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील ज्ञान वाढावे तसेच पर्यावरण व निसर्ग सौंदर्य संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील भूगोल व बी. व्होक. विभागाच्या वतीने दिनांक ७ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘वसुंधरा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, भूगोल विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास मंडळ संचालिका डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. गणेश गांधीले, प्रा. शितल गायकवाड, प्रा. रेवती नेवासकर, डॉ. ज्योती धोत्रे, प्रा. नाजनीन मनेर, प्रा. अविनाश राठोड, डॉ. विद्या पाटील तसेच भूगोल विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसुंधरा सप्ताहाच्या निमित्ताने भौगोलिक रांगोळी, सामान्य ज्ञान, नकाशा भरणे, पाककला, भौगोलिक प्रश्नमंजुषा, प्रोजेक्ट सादरीकरण, फोटोग्राफी, पीपीटी, मेहंदी तसेच भौगोलिक साहित्य प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. सविता कुलकर्णी यांनी, दरवर्षी भूगोल व बी. व्होक. विभागाच्या वतीने हा सप्ताह आयोजित करण्यात येतो. पर्यटन, पर्यावरण आणि माणूस म्हणून आपली भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास या उपक्रमातून मदत होते, असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी, वसुंधरा सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, सर्जनशीलता आणि व्यावहारिक ज्ञान विकसित होते. अशा उपक्रमांतूनच संवेदनशील व जबाबदार नागरिक घडतात, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जगताप यांनी “भूगोल हा केवळ विषय नसून तो निसर्ग, मानव आणि पर्यावरण यांचा सुसंवाद आहे. वसुंधरा सप्ताहातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांधीले यांनी मानले.






