छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजे भेट पालखी सोहळ्याचे लोणी स्टेशन चौकात जल्लोषात स्वागत…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजे भेट पालखी सोहळ्याचे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात गुरुवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय शिवराय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
लोणी स्टेशन चौकात पालखी रथाचे आगमन होताच शिवभक्तांनी फुलांची उधळण करून जल्लोष केला. यावेळी माजी सरपंच नंदू काळभोर, कदमवाकवस्तीचे उद्योजक सचिन काळभोर, व रूपराज काळभोर, त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर तसेच हवेली तालुका पालखी सोहळा संघटक लक्ष्मण चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात शाहीर महेश खुळपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी श्री शिवनेरी गड (ता. जुन्नर) ते श्री पुरंदर गड (ता. पुरंदर) या मार्गावर या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या पिता–पुत्रांची अखेरच्या क्षणी भेट होऊ न शकल्याने अधुरी राहिलेली ही भेट या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिवर्षी घडवून आणली जाते. या सोहळ्याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, शिवचरित्राचा प्रसार, शिवरायांचे पराक्रम तसेच रयतेसाठी राबवलेल्या विविध योजना यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
शिवचरित्र व शंभूचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून, हे या पालखीचे आठवे वर्ष आहे. या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. मार्गावरील विविध गावांमध्ये व्याख्याने, प्रवचने व इतिहासाचा जागर करून शिवविचारांचे प्रभावी प्रबोधन केले जाते.
Editer sunil thorat



