लोणी काळभोर पोलिसांकडून १६ गुन्ह्यांतील साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : दरोडा, घरफोडी व चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शिताफीने तपास करत लोणी काळभोर पोलिसांनी १६ गुन्ह्यांमधील तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व मुद्देमाल संबंधित फिर्यादी नागरिकांना परत करण्यात आला. त्यामुळे मुद्देमाल मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करत आभार मानले.
महाराष्ट्र पोलीस दलाचा २ जानेवारी स्थापना दिवस सप्ताह स्वरूपात साजरा करण्याचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने परिमंडळ ६ कार्यक्षेत्रातील मुद्देमाल वितरण समारंभ गुरुवारी (८ जानेवारी) विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या सभागृहात पार पडला.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. याप्रसंगी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त हेमंत जाधव, निखील पिंगळे, सोमई मुंडे तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या समारंभात परिमंडळ ६ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमधील मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम यांचा समावेश होता.
मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने प्राप्त करणाऱ्या किर्ती परमेश्वर शिंदे, संगिता पंडित बोडके, भीमाबाई भिव केसकर, वैष्णवी मयूर देवकर, वेणूबाई बाजीराव चौधरी, सचिन बबन तांबे, रंगनाथ संभाजी ढगे, निरंजनकुमार जितेंद्रकुमार सिंग यांचा समावेश आहे. वाहने परत मिळालेल्यांमध्ये वैशाली हरिश्चंद्र दुर्गाडे, सिद्धेश राजेंद्र राजपुरे, ज्ञानेश्वर भास्कर पानसरे, सचिन जयवंत औटी, राजेंद्र बबनराव काळभोर यांचा समावेश आहे. तर मोबाईल फोन रंजु विठ्ठलराव पाटील, नामदेव विकास पवार व स्वप्नील ईश्वर काळे यांना परत करण्यात आले.
लोणी काळभोर पोलिसांनी १६ गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करत ८ गुन्ह्यांमधील ५ लाख ४१ हजार ६९८ रुपये किमतीचे सोने, ५ गुन्ह्यांतील २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी वाहने तसेच ९३ हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल असा एकूण सुमारे ८ लाख ६७ हजार ६९८ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, पोलीस दल नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
दरम्यान, या वेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केतकी चव्हाण, पोलीस हवालदार महेश चव्हाण, वैजिनाथ शेलार, रवी आहेर, सोमनाथ गळाकाटे, उषा थोरात, नीलम धांडे आदी उपस्थित होते.
Editer sunil thorat



