‘पन्नास खोके’ म्हणजे थेट पन्नास कोटी; 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी – राज ठाकरेंनी आकड्यांत केली राजकीय व्यवस्थेची पोलखोल…

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज प्रसिद्ध झाली असून, या मुलाखतीत राज्यातील सत्ताकारण, भ्रष्टाचाराचे आरोप, मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचा प्रश्न यावर सडेतोड मते मांडण्यात आली आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही सविस्तर मुलाखत घेतली आहे.
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. 2022 साली एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा सुमारे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाला होता. याच पार्श्वभूमीवर ‘पन्नास खोके’ या शब्दप्रयोगावर राज ठाकरे यांनी आज थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केलं.
संजय राऊत यांनी भाजपकडून मुंबई महापालिकेत तब्बल 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला. “जर पालिकेकडे एवढे पैसे असतील, तर आमदार 50-50 कोटींना का पळून गेले?” असा थेट सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला.
यावर राज ठाकरे म्हणाले,
“एक मिनिट… मला या गोष्टीबद्दल नीट बोलायचं आहे. ते जे चालू होतं ना ‘पन्नास खोके, पन्नास खोके’… लोकांना हे नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. हा काही विनोद नाही. पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये. 40 आमदार म्हणजे थेट 2 हजार कोटी रुपये. हे पैसे कुठून आले? कसे आले?”
यावर संजय राऊत यांनी तात्काळ उत्तर दिलं, “भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून.” राज ठाकरे पुढे म्हणाले, “बरोबर ना. म्हणजे बँकेतून कर्ज काढून हे पैसे दिले नव्हते. मग भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का? इतके हजारो कोटी रुपये जर एका क्षणात उभे राहू शकतात, तर त्याची चौकशी का होत नाही?”
या वक्तव्यामुळे ‘पन्नास खोके’ प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासकामांवर आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर भाष्य केलं. “आज मुंबईत सर्वत्र रस्ते खोदलेले आहेत. जिकडे तिकडे मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. मेट्रो प्रकल्प, पूल, विविध पायाभूत सुविधा या सगळ्या आवश्यक आहेत, यात दुमत नाही. पण सगळं एकाच वेळी सुरू असल्यामुळे सामान्य मुंबईकर त्रस्त झाला आहे. विकास असावा, पण त्याला तारतम्य हवं,” असं ते म्हणाले.
मुंबईच्या खर्चाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईकर मोठ्या प्रमाणात कर भरतो. त्या कराच्या बदल्यात त्याला काय सुविधा मिळतात, याचा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे. अन्यथा आजसारखी परिस्थिती निर्माण होते, जिथे नागरिकांना रोजच्या जगण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.”
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या संयुक्त मुलाखतीमुळे केवळ ‘पन्नास खोके’ प्रकरणच नव्हे, तर मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, विकासकामांची दिशा आणि सत्तेचा गैरवापर या सर्व मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार असून, राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचं स्पष्ट संकेत या मुलाखतीतून मिळत आहेत.
Editer sunil thorat



