
तुळशीराम घुसाळकर
हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील आष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी व कलदरा खोलशेत परिसरात गेल्या अकरा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण कायम आहे.
आष्टापूर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावले होते. त्यापैकी मंगळवार (दि. ३० डिसेंबर) रोजी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर रविवार (दि. ११ जानेवारी) रोजी पहाटे आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या दुसऱ्या बिबट्याने रात्रीच्या वेळी मेंढपाळांच्या वस्तींवर हल्ले करून एका दिवशी एक मेंढी तर दुसऱ्या दिवशी तीन मेंढ्या ठार केल्या होत्या. या घटनांमुळे शेतकरी व मेंढपाळांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाण्यास कचरू लागले होते, तसेच उसतोडणी कामगारही ऊस तोडण्यास तयार नव्हते. दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी आष्टापूर पठारवाडी परिसरातील उसाच्या शेतात यापूर्वी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांनी विविध ठिकाणी अधिक पिंजरे लावून उर्वरित बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, माजी संचालक श्रीहरी कोतवाल, आष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, उपसरपंच संजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, शैला कोतवाल, रमेश कोतवाल, दत्तात्रेय कटके, कालिदास कोतवाल, उद्योजक राजेश कोतवाल, पोपट कोतवाल आदींनी वनविभागाकडे ही मागणी केली आहे.
गेल्या ११ दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळाल्याने वनविभागाच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात मेंढपाळांचे झालेले नुकसान यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. संबंधित शेतकरी व मेंढपाळांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी अनिकेत दादासो कोतवाल, हिरामण कोतवाल, दत्ता कोतवाल, सुभाष शांताराम कोतवाल यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.



