
हडपसर, पुणे : आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, निर्भय व अधिकाधिक मतदारांच्या सहभागातून पार पडावी, या उद्देशाने हडपसर प्रभागात दिव्यांग मतदारांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसर प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकार गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी रवी खंदारे, अविनाश पिसाळ व सुनील पाटील यांच्या नियोजनानुसार शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट, मांजरी (हडपसर) येथे दिव्यांग नागरिकांसाठी मतदान जनजागृती शपथविधी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमास जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिकांनी उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित सर्व दिव्यांग मतदारांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व, मतदान प्रक्रियेतील सुलभता तसेच दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष सोयी-सुविधांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांग नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) वापरून मतदान कसे करावे, मत नोंदवताना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच चार उमेदवार असतील अशा परिस्थितीत मतदानाची अचूक पद्धत प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली. मतदान करताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, तसेच मतदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
यानंतर उपस्थित दिव्यांग नागरिकांना आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत निश्चितपणे मतदान करण्याची शपथ देण्यात आली. या शपथविधीस दिव्यांग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास हडपसर स्वीप (SVEEP) टीमच्या श्रीमती रचना कांबळे, पुनम गायकवाड आणि अनुराधा चव्हाण उपस्थित होत्या. त्यांनी मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत दिव्यांग मतदारांनी कोणत्याही अडचणीशिवाय मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले
संपूर्ण कार्यक्रम शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat




