लोणी काळभोर पोलिसांची कर्तव्य तत्परता ; थेऊर–कोलवडी नदी पुलावर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण…

लोणी काळभोर (ता. हवेली) : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ–६ अंतर्गत येणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कर्तव्य तत्परता दाखवत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचविला आहे.
दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास थेऊर पोलीस चौकी येथे एक नागरिक घाबरलेल्या अवस्थेत धावत आला. त्याने थेऊर–कोलवडी नदी पुलावर एक महिला नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून महिला पोलीस अंमलदार पो.हवा. ६११७ वैशाली नागवडे तसेच मार्शल कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई ताम्हाणे व पोलीस शिपाई घुले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
थेऊर–कोलवडी नदी पुलावर एक महिला आत्महत्येच्या मनस्थितीत उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ धाडस दाखवत त्या महिलेला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले व थेऊर पोलीस चौकी येथे आणले. चौकशीत सदर महिलेने आपले नाव वैष्णवी सुरेश पांडागळे (वय २६), रा. भाडळे वस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे असे सांगितले. तिचे पती सुरेश पांडागळे यांनाही पोलीस चौकीत बोलावून घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करण्याचा विचार केल्याचे महिलेने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व महिला पोलीस अंमलदार वैशाली नागवडे यांनी त्या महिलेला व तिच्या पतीला समुपदेशन करून परिस्थिती समजावून सांगितली. जीवन महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देत तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आले. त्यानंतर सदर महिलेला तिच्या पतीच्या ताब्यात देऊन सुखरूप घरी पाठविण्यात आले.
या घटनेत महिला पोलीस अंमलदाराने दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचला असून पोलिसांच्या या संवेदनशील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ–६, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, मदतनीस पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पो.हवा. ६११७ वैशाली नागवडे, पोलीस शिपाई ताम्हाणे, घुले, महिला पोलीस शिपाई कदम, मपोशि खोत व मपोशि पोळ यांनी केली.
Editer sunil thorat



