विवाहित महिलेचा विनयभंग ; कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर (ता. हवेली) : धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ करून विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परमेश्वर साहेबराव शिंदे (व्यवस्थापक, खासगी कंपनी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत २९ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीता ही आपल्या आई-वडील, पती व दोन लहान मुलांसह वास्तव्यास आहे. पती मिळेल त्या ठिकाणी वाहनचालक म्हणून काम करतात, तर पिडीता सध्या एका किराणा दुकानात बिलिंगचे काम करते. पती-पत्नीच्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका चालते.
फिर्यादी महिला हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती येथील एका कंपनीत मे २०२५ मध्ये ऑफिस कर्मचारी म्हणून नोकरीस लागली होती. याच कंपनीत आरोपी परमेश्वर शिंदे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. आरोपीची पत्नीही त्याच ठिकाणी नोकरी करत होती.
फिर्यादीनुसार, १६ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी असताना आरोपीने तिच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठविला. हा संदेश चुकून पाठविला असावा, असा समज करून फिर्यादीने त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, १७ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ऑफिसमध्ये कोणीही नसताना आरोपी तिच्या जवळ आला व तिचा हात हातात घेऊन, “मी तुला काल मेसेज केला होता, तू पाहूनही रिप्लाय दिला नाहीस, तू मला खूप आवडतेस,” असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीने त्यास असे वर्तन चुकीचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे ती घाबरून ऑफिसमधून थेट घरी निघून गेली.
आरोपीच्या वागणुकीत सुधारणा होईल, या आशेने फिर्यादीने दोन ते तीन दिवस रजा घेत पुन्हा कामावर हजर झाली. मात्र त्यानंतरही आरोपीने ती ऑफिसमध्ये एकटी असताना वारंवार तिच्या मागे येऊन बोलण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
या सततच्या त्रासामुळे व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणून फिर्यादीने ऑक्टोबर २०२५ मध्ये सदर नोकरी सोडली व दुसरीकडे किराणा दुकानात नोकरी स्वीकारली. प्रतिष्ठेच्या भीतीपोटी तिने यापूर्वी आरोपीविरुद्ध कोणाकडेही तक्रार केली नव्हती.
दरम्यान, शनिवार (३ जानेवारी २०२६) रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिच्या मोबाईलवर फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. “धंदेवाली, तू लफडे लावतेस, माझ्या बायकोला काय सांगितलेस, तू घरे जाळायचे कमिशन घेतेस,” अशा अपमानास्पद शब्दांत धमकी दिल्याने फिर्यादी घाबरून गेली. सायंकाळी तिने हा प्रकार पतीला सांगितला. पती गावाबाहेर असल्याने ती आपल्या वडिलांसोबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग, धमकी व अश्लील शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.
Editer sunil thorat



