
लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी नियतकालिकाला यंदा १९४ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभातचे पत्रकार राजेंद्र काळभोर होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू करण्यामागील बाळशास्त्री जांभेकर यांचा मुख्य उद्देश समाजपरिवर्तन व लोकशिक्षण हाच होता. वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा खांब असून आजच्या काळात निर्भीड, सत्यशोधनात्मक पत्रकारितेसोबतच दुर्लक्षित घटकांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. प्रलोभनांना बळी न पडता समाजातील वास्तव प्रश्नांना प्राधान्य देणे ही आजच्या पत्रकारितेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बापू काळभोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ६ जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन नसून त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी नियतकालिकाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती समाजापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. पत्रकारितेचा पाया सत्य, निर्भीडता आणि समाजहितावर आधारित असून आजच्या डिजिटल व सोशल मीडियाच्या युगातही या मूल्यांची कास धरणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार रोखून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून घडले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार दिगंबर जोगदंड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या २०व्या वर्षी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून शिक्षक, समाजसुधारक, पत्रकार व संपादक अशा विविध भूमिका समर्थपणे निभावल्या. ब्रिटिश कालखंडात सुरू झालेले हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी अशा दोन स्तंभांत प्रसिद्ध होत असे. इंग्रजांना येथील जनतेच्या समस्या समजाव्यात, यासाठी त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. समाजपरिवर्तन व सत्यशोधन हाच पत्रकारितेचा गाभा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर म्हणाले की, वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा खांब आहे. ब्रिटिश राजवटीत समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. प्रिंट मीडियापासून सोशल मीडियापर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला असला, तरी फेक न्यूजच्या जमान्यात आजही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे. याच उद्देशाने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या विशेष सन्मान सोहळ्यासाठी राजेंद्र काळभोर, सिताराम लांडगे, दिगंबर जोगदंड, पंढरीनाथ नामुगडे, सुनील थोरात, बापू चौधरी, गणेश धुमाळ, तुळशीराम घुसाळकर, महेश फलटणकर आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले, तर आभार डॉ. स्नेहा बुरगुल यांनी मानले.
Editer sunil thorat








