
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी आनंद आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गंज पेठ येथील पत्रकार भवनात भव्य व अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमास धडाडीच्या रणरागिणी कर्तृत्ववान महिलांवर आधारित मराठी चित्रपटाचे ज्येष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे, ममता सिंधुताई सपकाळ, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्गचे बी. एन. खरात, आनंद आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अनिता केशव गोरे तसेच मल्टीपर्पज फाउंडेशनच्या रोहिणी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, उद्योग, कला, संस्कृती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या एकूण ८० कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
याच कार्यक्रमात आनंद आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या अनिता केशव गोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मार्गदर्शन करताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी सावित्रीबाई फुले व सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत महिलांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन केले. महिला कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटाच्या आगामी प्रदर्शनाबाबत माहिती देण्यात आली. त्या चित्रपटाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार होणार असून त्यावर सखोल चर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला पुरस्कारार्थी, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Editer sunil thorat




