
लोणी काळभोर (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी इंग्लिश मिडियम स्कूल, लोणी काळभोर येथे शाळा तपासणी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या तपासणी पथकाचे नेतृत्व सुरेश कांचन यांनी केले. त्यांच्या सोबत गोविंद जाधव, सावंत, सीताराम गवळी, आणि सत्यवान जगताप यांची उपस्थिती होती. शाळेत आगमन होताच लेझीम पथक व स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत मान्यवरांचे स्वागत केले. आर.एस.पी. ट्रूपकडून पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व शालेय परिपाठाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गायन कौशल्याच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
हिंदी राष्ट्रभाषा विषयात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. तपासणी पथकाने शाळेची सर्वांगीण पाहणी करत शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, अभिलेख, कामकाज नोंदी आणि विविध शालेय उपक्रम प्रत्यक्ष तपासले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाची पथकाने विशेष दखल घेतली.
पथकप्रमुख सुरेश कांचन यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत गुणवत्तावाढीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. उपक्रमशील शाळा म्हणून इंग्लिश मिडियम स्कूलची ओळख निर्माण होत असल्याची भावना गोविंद जाधव यांनी व्यक्त केली. शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, शैक्षणिक प्रगतीसाठी घेतले जाणारे परिश्रम आणि सकारात्मक वातावरण यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य पौर्णिमा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज इनामदार, शेख, शितोळे, काळभोर वैशाली, कदम, टिळेकर आणि काळभोर प्रियांका यांनी विशेष मेहनत घेतली. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित सहभागामुळे हे अभियान शाळेसाठी प्रगतीचा उत्सव ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पौर्णिमा शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रीती कदम यांनी मानले.
Editer sunil thorat




