
डॉ गजानन टिंगरे
कळस (ता. इंदापूर) : बागवाडी (खटके वस्ती), ता. इंदापूर जि. पुणे येथे सद्गुरु श्री संत बाळूमामा महाराज यांच्या वार्षिक पौष पौर्णिमा भंडारा उत्सवाचे आयोजन अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आले. पौष पौर्णिमेच्या पावन शुभमुहूर्तावर ह. भ. प. अनिल महाराज पोरे यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी व ओघवत्या वाणीतून संत बाळूमामा महाराज यांच्या विचारांचा, भक्तीमार्गाचा आणि मानवसेवेच्या संदेशाचा प्रभावीपणे जागर करण्यात आला. किर्तन ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भंडारा उत्सवानिमित्त अध्यात्मिक संत सेवाभावी ट्रस्ट, जंक्शन (साईनगर) यांच्या वतीने दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी कळस बागवाडी (खटके वस्ती) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ४५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
रक्तदान शिबिराबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष जमीर शेख यांनी सांगितले की, संत बाळूमामा महाराजांच्या विचारांनुसार मानवसेवा हाच खरा धर्म असून, “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबत समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा ट्रस्टचा नेहमीच प्रयत्न असतो.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष जमीर शेख यांच्यासह पांडुरंग खटके, कुणाल खटके, कुणाल गावडे, अक्षय खटके, नाना खटके, राजाराम खारतोडे, दत्ता खारतोडे आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्यामुळे पौष पौर्णिमा भंडारा उत्सव व रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा सोहळा परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला.
Editer sunil thorat



