
लोणी काळभोर (ता. हवेली) : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन व मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि पंचक्रोशीतील पत्रकार यांच्यात एमआयटी येथील मैदानावर अत्यंत उत्साहात क्रिकेट सामना पार पडला. २ ते ८ जानेवारीदरम्यान साजऱ्या होत असलेल्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांअंतर्गत ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधत या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. खेळाच्या माध्यमातून पोलीस व पत्रकार यांच्यातील परस्पर स्नेह, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा सामना विशेष ठरला.
या सामन्याचे उद्घाटन परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, बिराजदार तसेच अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाणेफेक जिंकून लोणी काळभोर पोलीस संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिस्तबद्ध फलंदाजी आणि प्रभावी फटकेबाजीच्या जोरावर पोलीस संघाने समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पत्रकार संघाने आक्रमक फलंदाजी करत पोलीस संघाला कडवे आव्हान दिले. सामना शेवटच्या षटकांपर्यंत रंगतदार ठरला. मात्र पोलीस संघाचा उत्कृष्ट फिटनेस, संघभावना आणि क्षेत्ररक्षणातील चपळता यामुळे अखेर पोलीस संघाने विजय मिळविला.
या सामन्यात सर्वांगीण कामगिरी केल्याबद्दल पोलीस संघातील योगेश उदमले यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस व पत्रकार या क्रिकेट सामन्याचे उत्तम आयोजन पोलीस अंमलदार रवी आहेर यांनी केले. तर सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी हवेली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल काळभोर व डॉ. रतन काळभोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सामन्याच्या निमित्ताने पोलीस दलाचा शारीरिक फिटनेस, शिस्त आणि तत्परतेचा प्रत्यय मैदानावर आला. पत्रकार संघाने जिद्दीने लढत दिली असली तरी सरावाच्या अभावामुळे पराभव पत्करावा लागला. मात्र या पराभवातून धडा घेत पुढील वर्षी पोलीस संघाला पराभूत करण्याचा निर्धार पत्रकार संघाने यावेळी व्यक्त केला. खेळाच्या माध्यमातून पोलीस आणि पत्रकार यांच्यातील आपुलकी व सौहार्द अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
Editer dunil thorat





