सावित्रीबाई फुले यांच्या विचारातून महिला सशक्तीकरणाची प्रेरणा – शितल सुजित कांबळे…

लोणी काळभोर (ता. हवेली) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, लोणी काळभोर येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व महिला सशक्तीकरणाच्या कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात वि. वि. कार्यकारी सोसायटी लोणी काळभोरचे संचालक संजय भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करत भारतीय समाजरचनेवर प्रभाव टाकणाऱ्या थोर महापुरुषांच्या कार्याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांनी साजरी केली, तर सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिराव फुले यांनी रोवली, असे त्यांनी सांगितले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा मानवतावादी महामानवांच्या विचारांवर आजचा भारत उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल सुजित कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, समाजाकडून अपमान, दगड-गोटे व चिखल सहन करूनही सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. महिलांना शिक्षणाचा, पुनर्विवाहाचा अधिकार मिळावा, समाज जागृत व्हावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आज महिला डॉक्टर, वकील, अभियंता, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री, राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत, यामागे सावित्रीबाई फुले यांचे अमूल्य योगदान आहे.
महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबवायचे असतील तर महिला सुशिक्षित व सशक्त होणे आवश्यक आहे, हा सावित्रीबाईंचा विचार आजही तितकाच कालसुसंगत असल्याचे शितल कांबळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
महिला शिक्षकांचा सन्मान…
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या शितल सुजित कांबळे यांच्या पुढाकारातून समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुजित कांबळे, संजय भालेराव, लोणी काळभोरचे पोलीस पाटील दादा काळभोर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महिला पोलीस हवालदार ज्योती नवले, जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप, शिक्षक रोहिदास मेमाणे, नामदेव शेंडेकर, सुनील जाधव, रघुनाथ शिंदे, मनीषा टिळेकर, राजश्री वाघमारे, मनीषा काळे, मुरादे मॅडम, शितोळे मॅडम, खुटवड मॅडम, तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या मीना नेवसे व शिक्षक पृथ्वीराज काळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच भौतिक सुविधांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक रोहिदास मेमाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Editer sunil thorat






