
थेऊर (ता. हवेली) : नववर्षातील पहिल्याच अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांसह पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर दर्शनासाठी झालेल्या प्रचंड वर्दळीमुळे संपूर्ण थेऊर गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
आज पहाटे सुमारे चार वाजता श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी महेश आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले केले. पहाटे दर्शनासाठी गर्दी तुलनेने कमी होती; मात्र सकाळी नऊ वाजल्यानंतर भाविकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. दर्शनरांग थेट भिल्लवस्तीपर्यंत पोहोचली होती व दिवसभर ती वाढतच राहिली.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सात वाजता ट्रस्टचे विश्वस्त केशव विध्वंस यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडी वाटप करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण आवारात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दर्शनबारीवर मंडप, पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची सोय तसेच भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.
सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह. भ. प. देठे महाराज शास्त्री (पैठण) यांचे सुभाष्य कीर्तन पार पडले. चंद्रोदयानंतर आगलावे बंधूंच्या हस्ते श्री चिंतामणीची पालखी (छबिना) काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापक संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इंस्पेक्टर दिगंबर सोनटक्के, रत्नदीप बिराजदार पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व पोलीसमित्र यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन योग्य केल्याने वाहतूक कोंडी टळली आणि गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला.
मात्र, आज गर्दीचे प्रमाण अधिक असताना १ जानेवारी रोजी पोलिसांनी सूचना देऊनही मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील अरुंद रस्त्यावर दुर्वा व फुलांच्या विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने रस्ता अधिक अरुंद झाला. त्यामुळे भाविकांना अडथळ्यांतून मार्ग काढत मंदिरापर्यंत जावे लागले. यामुळे अनेक भाविकांनी नाराजी ही व्यक्त केली. लवकरच पोलीस प्रशासन, थेऊर ग्रामपंचायत प्रशासन मार्ग काढतील अशी आशा भक्तांनी व्यक्त केली.
Editer sunil thorat





