जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लोणी काळभोर पोलिसांवर गंभीर आरोप, निवेदनानंतरच बनावट गुटखा कारखाना उध्वस्त ; स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह…

लोणी काळभोर (ता.हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेले काही महिने हातभट्टी दारू, गुटखा-तंबाखू पदार्थांचे खुलेआम वितरण, मटका-जुगार तसेच नशेच्या पदार्थांची विक्री निडरपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन भिमक्रांती सेनेने केला आहे. सामाजिक सेवा संस्थे अंतर्गत कार्यरत असलेल्या या संघटनेचे महासचिव गणेश शिवाजी जाधव यांनी थेट पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि काही कर्मचाऱ्यांचा अवैध धंद्यांना ‘छुपे संरक्षण’ असल्याचा ठोस दावा केला आहे.

निवेदनात अवैध धंद्यांमधून हप्त्यांच्या नावाखाली मोठी रक्कम गोळा होऊन ती पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच काढलेल्या ‘नशामुक्ती फेरी’चा उद्देशही प्रत्यक्षात अवैध धंदेवाल्यांकडून अतिरिक्त वसुली करणे हा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही फरार आरोपींना पैशांच्या मोबदल्यात संरक्षण दिल्याचे, तसेच राज्यात गुटखा बंदी असतानाही काही पोलिसांचे गुटखा सेवन करणारे छायाचित्र पुरावेही आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यासोबतच अवैध धंद्यांचे व्हिडिओ, फोटो आणि पेन ड्राईव्हही थेट कार्यालयात जमा करण्यात आले.

या तक्रारीची नोंद झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच लोणी काळभोर परिसरातील बनावट ‘आरएमडी’ गुटखा कारखान्यावर अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने केलेल्या पहाटेच्या धडक कारवाईने खळबळ उडवली. जवळपास एक कोटींचा गुटखा साठा, साहित्य, पॅकिंग यंत्रणा आणि वाहने जप्त झाली. विशेष म्हणजे, ही कारवाई स्थानिक पोलिसांनी न करता थेट पुण्यातून आलेल्या पथकाने केली. एवढा मोठा कारखाना गावात सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची भनकही कशी लागली नाही? तक्रारीत ‘चिठ्ठी संरक्षणा’चे आरोप असताना इतका प्रचंड गैरव्यवहार त्यांच्या नजरेतून कसा सुटला? या प्रश्नांनी स्थानिक पोलिसांच्या कामकाजावर संशयाचे जाळे आणखी गडद केले आहे.

आता या प्रकरणात गुटखा विक्रेत्यांवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारखाना उभारणारे, जागा उपलब्ध करून देणारे, पाठबळ देणारे तसेच जप्त वाहनांचे मालक – या सर्वांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांचे CDR तपासून संपर्क-साखळी, हप्ते व्यवहार आणि संरक्षण नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.

तक्रारदारांच्या निवेदनात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या जमा मालमत्तेची खातेनिहाय चौकशी, अवैध वसुलीत सहभागी कर्मचाऱ्यांची तातडीने पडताळणी आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन पोलीस आयुक्तांसह परिमंडळ ५ चे उपायुक्त, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व जिल्हा न्यायालयालाही पाठवण्यात आले आहे.

        गणेश जाधव, महासचिव                              रिपब्लिकन भिमक्रांती सेना

गणेश जाधव यांनी सांगितले की, “यापूर्वीही याच संदर्भात निवेदन दिले होते. २ डिसेंबर रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

                 डॉ. अमोल कोल्हे ,                                          खासदार, शिरुर हवेली

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, “राज्यात गुटखा बंदी असताना पुणे शहराच्या शेजारीच, आयुक्तालयाच्या परिघात गुटखा उत्पादनाचा कारखाना मशीनसह चालू अवस्थेत आढळतो यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. अवैध धंद्यांना नेमके कोणाचे संरक्षण आहे हे उघड झालेच पाहिजे. सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.”

निवेदन, आरोप, त्यानंतरची कारवाई आणि अचानक उघडकीस आलेला बनावट गुटखा कारखाना – या घटनाक्रमामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील काही दिवसांत आयुक्तालय कोणती ठोस आणि निर्णायक भूमिका घेते, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??