लोणी काळभोर हद्दीतील कांबळे वस्ती मध्ये जवळपासकोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा कारखाना उध्वस्त; अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची पहाटेची धडक कारवाई
जवळपास एक कोटींचा बनावट ‘आरएमडी’ गुटखा कारखाना उध्वस्त; अंमली पदार्थ विरोधी पथक–२ ची पहाटे थरकाप उडवणारी धडक कारवाई

थेऊर (पुणे) : अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीत राबवलेल्या नियोजनबद्ध आणि कडक कारवाईत तब्बल १ कोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा आणि सुगंधीत तंबाखू तयार करणारा कारखाना उध्वस्त केला. पहाटेच्याच वेळेत केलेल्या या धाडीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखू उत्पादन, कच्चामाल, वाहने आणि रोख रक्कम जप्त करून गुटखा रॅकेटला मोठा तडा दिला आहे.
घटनांनुसार, ४ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पीएसआय अस्मिता लाड व त्यांच्या पथकाने शहरात अंमली पदार्थ व गुटखा विरोधी विशेष मोहिम राबवित असताना पहाटे ५ वाजता कांबळे वस्ती, थेऊर फाटा परिसरात सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनमध्ये बनावट गुटखा तयार होत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पथकाने धाड टाकत गोडाऊनमध्ये साठवलेला बनावट आरएमडी गुटखा, विमल गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाला, तंबाखू तयार करण्यासाठी लागणारा बनावट कच्चामाल – केमिकल, थंडक, गुलाबपाणी, बनावट सुपारी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स, पोती इत्यादी मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत केले. संपूर्ण मुद्देमालाची किंमत १ कोटी रुपये इतकी आहे.
याशिवाय, गुटखा वाहतूक करण्यासाठी खास मॉडिफाय केलेल्या दोन इनोव्हा कार (MH 44 B 2023, MH 12 DM 0885) आणि टाटा नेक्सॉन (MH 12 QT 8462) अशा ५० लाखांच्या तीन गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली.
कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (२५) यास अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती (५०), अप्पु सोनकर (४६), दानिश खान (१८) यांनाही ताब्यात घेण्यात आले. गोडाऊनचा मालक सुमित गुप्ता फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 26(2)(i)(iv) सह 59 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बनावट गुटखा तयार करून नागरिकांच्या आरोग्यावर गदा आणणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, डीसीपी निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकातील राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचा सक्रिय सहभाग होता.
कारवाईदरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा संपूर्ण कर्मचारी वर्गही उपस्थित होता. या छाप्यातून परिसरातील बनावट गुटखा रॅकेटचे मोठे जाळे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
Editer sunil thorat







