
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळील सूर्या पार्क परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाड्याने वास्तव्यास असलेल्या संतोष जाधव यांचा मुलगा यश जाधव (वय अंदाजे १५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यश जाधव हा हडपसर येथील साधना शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजता यशचे आई-वडील व भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यश हा घरी एकटाच होता आणि नेहमीप्रमाणे सकाळी अकरा वाजता शाळेत जाणार होता.
सायंकाळी पाचच्या सुमारास संतोष जाधव कामावरून घरी परतले असता, यश घरातील फॅनच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी खुर्चीही पडलेली होती. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. यशला तपासणीसाठी विश्वराज हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.
यशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
Editer sunil thorat



