शेवाळेवाडीतील सराफ दरोडा २४ तासांत उघडकीस, ३ आरोपी जेरबंद, ३ विधीसंघर्षित बालक ताब्यात ; ५२.८८ लाखांचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत…

शेवाळेवाडी (हडपसर) : हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी येथील सराफ दुकानावर टाकलेला दरोड्याचा गुन्हा पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून ३ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तब्बल ५२ लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी (पुणे) येथील शिवचैतन्य कॉलनी क्रमांक १ मधील “महावीर ज्वेलर्स” या सराफ दुकानात ४ ते ५ अनोळखी दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत काउंटरची काच फोडली. दुकानातील डिस्प्ले बोर्ड व कपाटांमधील एकूण ५२८.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असा सुमारे ५२.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा घडताच वरिष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ तसेच युनिट ५ गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. मांजरी, लोणी काळभोर व हडपसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना ४ जानेवारी रोजी दुपारी मांजरी बुद्रुक येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ प्रविण महादेव शिंदे (वय १८, रा. फुरसुंगी), भावेश राजेश चव्हाण (वय २०, रा. हडपसर) आणि एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान त्यांनी हा दरोडा राजदीप संतोष जगताप (वय २१, रा. लोणी काळभोर) व अन्य तीन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकत राजदीप जगताप व दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यातील मालापैकी २२४.९२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १८३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून उर्वरित दागिन्यांची प्रतवारी व वजन प्रक्रिया सुरू आहे. सर्व आरोपी व विधीसंघर्षित बालकांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी मांजरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे यांच्यासह दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, युनिट ५, युनिट ४ व युनिट ६ गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
२४ तासांत दरोड्याचा गुन्हा उघड करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केल्याने पुणे शहर गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Editer sunil throat



