
लोणी काळभोर (ता. हवेली) : महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात कायदा, सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय, परिमंडळ ६ अंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या अंतर्गत कार्यरत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर व कन्या प्रशाला लोणी काळभोर यांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी तसेच पोलीस स्टेशनमध्ये वापरात असलेल्या शस्त्रांची माहिती व प्रात्यक्षिक प्रत्यक्ष दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन केवळ कायदे अंमलात आणणारी यंत्रणा नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारी सेवा व्यवस्था आहे, याची जाणीव झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा थोडक्यात आढावा घेत इंग्रजांविरुद्ध झालेल्या लढ्यांनंतर देशात आधुनिक पोलीस व्यवस्था कशी अस्तित्वात आली, याची माहिती दिली. स्वातंत्र्यानंतर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर कशी आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
तसेच वाहतूक नियमांचे महत्त्व, वेगमर्यादा पाळण्याची गरज, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, मोबाईल वापरून वाहन चालविण्याचे धोके याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात व सार्वजनिक ठिकाणी कोणती खबरदारी घ्यावी, याची माहितीही त्यांनी दिली. पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये कसे सहकार्य करावे, हेही त्यांनी स्पष्ट केले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवी आहेर यांनी कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाते, सण-उत्सव, सभा, मिरवणुका व मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी बंदोबस्त कसा ठेवला जातो, याची माहिती दिली. तसेच पोलीस स्टेशनमधील १७ वेगवेगळ्या विभागांचे कामकाज, त्यांची जबाबदारी व नागरिकांशी संबंधित सेवा याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भापकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या बंदुका व रायफल्सची माहिती, त्यांची रेंज, वापराची पद्धत, शस्त्र हाताळताना घ्यावयाची सुरक्षितता आणि शस्त्रांचा वापर केवळ कायद्याच्या चौकटीतच कसा केला जातो, याचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शस्त्रांविषयी अनेक प्रश्न विचारत मोठी उत्सुकता दाखवली.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अणिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भापकर, पोलीस हवालदार रवी आहेर, ज्योती नवले, पोलीस शिपाई संदीप धुमाळ, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर येथील इयत्ता आठवीचे ३६ विद्यार्थी, तसेच कन्या प्रशाला लोणी काळभोर येथील इयत्ता आठवी ‘ब’ मधील ४७ विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे शिक्षक राजेश चौरे, तसेच कन्या प्रशालेच्या अश्विनी मोकाशी व मनीषा पावरा उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सुव्यवस्था, नागरिकांची जबाबदारी आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त केली.
Editer sunil thorat









