
तुळशीराम घुसाळकर
उरुळी कांचन (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार (दि. १५ जानेवारी) रोजी सकाळी उरुळी कांचन ग्रामपंचायत इमारतीसमोर असलेल्या एका दुकानाच्या बाहेर भानामती व करणी-जादूटोण्याचे साहित्य आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत सचिवालयाच्या समोरच असलेल्या दुकानाबाहेर एका कापडी पिशवीत लाल, काळा व पिवळा रंग लावलेली लिंबू, दोरे, सुया तसेच काळ्या बाहुल्या गुंडाळून ठेवलेल्या आढळून आल्या. हा प्रकार सकाळी नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. उरुळी कांचनसारख्या मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावात तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने इच्छुकांनी गाठीभेटी, बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अंगारा, धुपारा, टाचणी, लिंबू, बिबवे तसेच देवाचा भंडारा विरोधकांच्या घरासमोर टाकण्याचे प्रकार गुप्तपणे सुरू असल्याची चर्चा आहे. आता तर थेट ग्रामपंचायत इमारतीसमोरच करणी करण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत सचिवालयात रोहित जाधव व विशाल जाधव हे दोन भाऊ कार्यरत असून सचिवालयाच्या बाहेर त्यांचे मासे विक्रीचे दुकान आहे. हे दुकान त्यांची आई चालवते. बुधवारी रात्री दुकान बंद करून सर्वजण घरी गेले होते. याच रात्री अज्ञात व्यक्तीने दुकानासमोर जादूटोण्याचे साहित्य ठेवले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी बेवारस पिशवी आढळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी हा प्रकार अंधश्रद्धा पसरवून मानसिक दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले. पुरोगामी महाराष्ट्रात, तेही पुणे शहरालगतच्या गावात अशा अघोरी प्रकारांचा शिरकाव झाल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना विरोधकांना पराभूत करण्यासाठी जादूटोण्यासारख्या अनिष्ट प्रथांचा अवलंब केला जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. मतदानाचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी लागणार असला तरी या प्रकारामागे नेमके कोणाचे मनसुबे आहेत, लिंबू-नारळाची पूजा कोणी मांडली, याबाबत उरुळी कांचनसह संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असताना अशा घटनांमुळे समाजात अंधश्रद्धा आजही किती खोलवर रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी व समाजात जनजागृती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.
Editer sunil thorat




