राष्ट्रवादीत फूट, भाजप आक्रमक ; पुणे जिल्हा परिषद निवडणूक निर्णायक वळणावर
७३ गटांसाठी महासंग्राम ; पुणे जिल्हा परिषदेची सत्ता कुणाची?

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारीला होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, गट–गण पातळीवर बैठका, चर्चासत्रे, तडजोडी आणि पॅनल बांधणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण समाविष्ट असल्याने दोन्ही निवडणुकांसाठी एकत्रित पॅनल उभे करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काटेकोर व्यूहरचना आखली जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित आहे. २०१७ च्या निवडणुकीत ७५ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ४४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. त्या वेळी शिवसेनेला १३, भाजप व काँग्रेसला प्रत्येकी ७ तर अपक्ष व इतरांना काही जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर जवळपास चार वर्षांचा प्रशासक राजवट, बदललेली लोकसंख्या, आरक्षणातील फेरबदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे यंदाची निवडणूक पूर्णपणे वेगळ्या राजकीय वातावरणात होत आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर जिल्हा परिषदेमधील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट — शरद पवार आणि अजित पवार — सर्व तालुक्यांमध्ये एकत्र लढतील, अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. काही तालुक्यांत मैत्रीपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी बहुतांश ठिकाणी स्वतंत्र लढतीचीच तयारी सुरू आहे.
याच वेळी शिवसेनेतील फूट आणि बदललेली युती–आघाडीची गणिते पाहता, या निवडणुकीत अजित पवार गटासमोर भाजपच प्रमुख विरोधक म्हणून उभा राहणार, हे स्पष्ट झाले आहे. काही तालुक्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला भाजप व शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीचा सामना करावा लागणार असून, त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकतर्फी ठरणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकीकडे अजित पवार गटाकडून विरोधी पक्षांतील ताकदवान उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे भाजपसह इतर पक्षांकडूनही स्थानिक पातळीवर जुळवाजुळवी करून मजबूत पॅनल उभे करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्हा परिषदेमध्ये एकूण ७३ गट असले, तरी प्रत्यक्षात जुन्नर, खेड आणि इंदापूर हे प्रत्येकी आठ गट असलेले तालुके जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात जाणार, हे ठरवणारे ठरणार आहेत. या तीन तालुक्यांतील निकालांनीच सत्तास्थापनेचा कौल लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रत्येकी सात गट असलेले दौंड आणि शिरूर हे तालुकेदेखील सत्ता स्थापनेच्या गणितात निर्णायक भूमिका बजावू शकतात.
याशिवाय बारामती तालुक्यात अजित पवार गटासमोर विरोधक किती प्रभावी मोट बांधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बारामतीत अजित पवार यांचे पारंपरिक वर्चस्व असले, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येथील लढतही लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
तालुकानिहाय जिल्हा परिषद गट पाहिले, तर जुन्नर ८, आंबेगाव ५, शिरूर ७, खेड ८, मावळ ५, मुळशी ३, हवेली ६, दौंड ७, पुरंदर ४, वेल्हे २, भोर ४, बारामती ६ आणि इंदापूर ८ असे एकूण ७३ गट आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण असल्याने पंचायत समितीमध्ये सदस्यसंख्या गटांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निकालांचाही जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणावर थेट परिणाम होणार आहे.
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, भाजपची आक्रमक तयारी, बदललेली लोकसंख्या आणि आरक्षणामुळे बदललेली समीकरणे पाहता, यंदाची पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही अजित पवारांची राजकीय ताकद आणि नेतृत्वाची कसोटी पाहणारी, तसेच भाजपसाठी सत्ता हस्तगत करण्याची मोठी संधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Editer sunil thorat



