तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू ; योजना, अर्ज व तक्रारींसाठी एकाच क्रमांकावर सुविधा…वाचा सविस्तर…

पुणे : केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 आणि नियम 2020 यांच्या अंमलबजावणीअंतर्गत तृतीयपंथी समाजातील व्यक्तींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय पोर्टल विकसित करण्यात आले असून, त्याअंतर्गत राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाइनद्वारे तृतीयपंथीयांना शासकीय योजना, सेवा व हक्कांबाबत सुलभ आणि थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
या राष्ट्रीय हेल्पलाइनच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन, अर्ज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण तसेच विविध प्रकारच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तृतीयपंथी समाजातील नागरिकांना शासकीय यंत्रणांशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार असून त्यांच्या समस्यांवर वेळेत तोडगा काढण्यास मदत होणार आहे.
तृतीयपंथी समाजातील व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना सामाजिक प्रवाहात मुख्य प्रवाहात आणणे तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनमुळे तृतीयपंथीयांसाठी एक विश्वासार्ह संपर्क माध्यम उपलब्ध झाले असून त्यांच्या प्रश्नांना अधिकृत पातळीवर उत्तर मिळणार आहे.
तरी तृतीयपंथी समाजातील नागरिकांनी तसेच संबंधित संस्था व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे यांनी केले आहे.
Editer sunil thorat



