हवेलीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत; कटके–कंद यांची प्रतिष्ठा पणाला
महायुती-अनिश्चित, हवेलीत राष्ट्रवादी–भाजप थेट सामना रंगणार

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : हवेली तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यंदा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विधानसभेप्रमाणे महायुती किंवा महाविकास आघाडीचा प्रयोग या निवडणुकीत झाला नाही, तर महापालिका निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट लढत रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यावर वर्चस्व असलेल्या प्रस्थापित राष्ट्रवादीसमोर भाजपचे मोठे आव्हान उभे ठाकणार असून, ही निवडणूक शिरूर–हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांनी स्वतंत्र लढत दिली होती. त्याच धर्तीवर याही निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून, आमदार माऊली कटके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यासह प्रमुख नेते आपल्या-आपल्या पक्षीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या हद्दवाढीमुळे हवेली तालुक्याचा राजकीय नकाशाच बदलला आहे. वाघोली व मांजरीसारखी लोकसंख्येने मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने आता हवेली तालुक्यात केवळ सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक गट अत्यंत निर्णायक ठरणार असून, कमी जागांमुळे चुरस अधिक वाढली आहे. पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने थेऊर, केसनंद, कोरेगाव मूळ व खानापूर गणातील इच्छुकांमध्ये विशेष हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचे गाव असलेल्या पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातही मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या गटात जिल्हा परिषदेसाठी तीन प्रबळ दावेदार इच्छुक असल्याने अंतर्गत राजकारण तापले आहे. त्यामुळे हा गट केवळ स्थानिक नव्हे, तर आमदार कटके आणि प्रदीप कंद यांच्यासाठी प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यापूर्वी पेरणे–वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केलेल्या कल्पना सुभाष जगताप यांचा पेरणे गण यावेळी फेररचनेत वाडेबोल्हाईऐवजी लोणीकंदला जोडला गेला आहे. त्याचबरोबर आव्हाळवाडी गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथील प्रबळ पुरुष इच्छुकांच्या हालचालींना ब्रेक लागला आहे.
आरक्षणामुळे इतरही अनेक गटांतील समीकरणे बदलली आहेत. लोणी काळभोर–कदमवाकवस्ती गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी, उरुळी कांचन अनुसूचित जाती महिला, सोरतापवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, लोणी काळभोर मागास प्रवर्ग महिला, तर खेड शिवापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या प्रस्थापित इच्छुकांमध्ये सध्या शांतता दिसून येत आहे. गतवेळच्या निवडणुकीत पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन गटांमध्ये विजय मिळवला होता, तर लोणी काळभोर गटात राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने बाजी मारली होती. मात्र, यंदा तोच लोणी काळभोर–कदमवाकवस्ती गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
सध्याचे आमदार माऊली कटके यांनी पूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या तत्कालीन वाघोली गटातून शिवसेनेची उमेदवारी घेत विजय मिळवला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवली. मात्र, त्यावेळी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे स्पष्ट राजकीय पॅटर्न अस्तित्वात होते. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र असे कोणतेही ठोस आघाडीचे संकेत नसल्याने महापालिका निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे. या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांसाठी इतर पक्षांचा पर्याय खुला राहणार आहे.
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी तळागाळात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीत प्रदीप कंद यांना मिळालेले यश आणि पीएमआरडीए सदस्य निवडणुकीत भाजप सरचिटणीस स्वप्निल उंद्रे यांच्या विजयामुळे भाजपचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. मात्र, शहरालगतचा भाजपचा प्रभावी भाग महापालिकेत गेल्याने आणि यंदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता असल्यास भाजप प्रस्थापित राष्ट्रवादीला कितपत आव्हान देऊ शकतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.
एकूणच बदललेली लोकसंख्या, आरक्षणामुळे बदललेली समीकरणे आणि महायुती–आघाडीबाबत असलेली अनिश्चितता पाहता, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट आणि प्रतिष्ठेची लढाई ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Editer sunil thorat



