भरधाव स्कुटर घसरून झालेल्या अपघातात प्रवासी ठार ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

उरुळीकांचन : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन गावच्या हद्दीत विष्व पेट्रोल पंपासमोर भरधाव स्कुटर घसरून झालेल्या अपघातात प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी घडली. याप्रकरणी स्कुटर चालकाविरुद्ध उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत नंदु बहरैची कुमार (वय 55, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्कुटर चालक आकाश दिनेशकुमार राणा (वय 21, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. सिरोही, राजस्थान) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश राणा हा त्याच्या ताब्यातील सुझुकी अॅक्सेस स्कुटर (क्रमांक MH 12 TL 6908) वरून नंदु कुमार यांना पाठीमागे बसवून पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात जात होता. रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अचानक तोल गेल्यामुळे स्कुटर घसरून अपघात झाला. या अपघातात नंदु कुमार यांना डोके व पोटावर गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी संतोष लक्ष्मण झोंबाडे (वय 35, व्यवसाय – ॲम्ब्युलन्स चालक, रा. झोंबाडेवस्ती, उरुळीकांचन) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार भोसले करीत आहेत.
Editer sunil thorat



