बारामतीत ‘कृषिक २०२६’ कृषी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन ; आधुनिक तंत्रज्ञान व एआयवर भर…

बारामती (पुणे) : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने आयोजित ‘कृषिक २०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार (दि. १७) रोजी उत्साहात पार पडले. या उद्घाटन समारंभास आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दि. १७ ते २४ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी राजेंद्र पवार व संपूर्ण आयोजन समितीचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रदर्शनामुळे शेती क्षेत्रात येणारे नवनवे तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कृषी प्रदर्शनात शेती क्षेत्रातील आधुनिक यंत्रसामग्री, स्मार्ट शेती, अचूक शेती (Precision Farming), जैविक शेती, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण यासह विविध विषयांवर माहिती व प्रात्यक्षिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून कमी खर्चात उत्पादन कसे वाढवता येईल, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याशिवाय विविध पिकांचे सुधारित वाण, आधुनिक बियाणे, खत व्यवस्थापन व नव्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनात मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेती अधिक शाश्वत व आधुनिक बनवणे आणि बदलत्या काळात शेतीला नवी दिशा देणे, हा ‘कृषिक २०२६’ चा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीत प्रगती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, प्रताप पवार, खासदार सुनेत्रा पवार, सुनंदा पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
‘कृषिक २०२६’ कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नव्या संधी, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा लाभ होणार असून, बारामतीसह राज्यातील कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Editer sunil thorat








