लोहार समाजाच्या महामंडळाच्या नावाची पाटी लावण्याची मागणी ; २२ जानेवारीला निवेदन देणार…

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाने लोहार समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी ब्रह्मलीनाचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन केले आहे. शासनाने काढलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार या महामंडळाचे कार्यालय अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन, सावेडी येथे कार्यरत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर कार्यालयाच्या दर्शनी भागावर महामंडळाच्या नावाची कोणतीही अधिकृत पाटी लावण्यात आलेली नसल्याचे आढळून आले असून, यामुळे लोहार समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने सामाजिक न्याय भवन, सावेडी येथील संबंधित कार्यालयाच्या दर्शनी भागावर ब्रह्मलीनाचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाची अधिकृत पाटी तातडीने लावण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे. यासाठी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी संबंधित कार्यालयास निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन समाज बांधव गणेश रामदास भालके यांनी केले आहे. निवेदन देताना उपस्थित राहू इच्छिणाऱ्या लोहार समाजाच्या विविध संघटना, संस्था व समाज बांधवांनी आपली नावे कळवून जाणूनबुजून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले आहे.
भालके यांनी सांगितले की, “लोहार समाजासाठी शासनाने स्थापन केलेल्या महामंडळाची ओळख व अस्तित्व समाजासमोर स्पष्ट होण्यासाठी कार्यालयावर अधिकृत नावाची पाटी असणे अत्यावश्यक आहे. पाटी नसल्याने समाजाची दिशाभूल होत असून अनेक समाज बांधवांना महामंडळाच्या कार्यालयाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ही बाब तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.”
तसेच, “आपापसातील वादविवाद, श्रेयवाद किंवा मतभेद बाजूला ठेवून लोहार समाजाने शासनाच्या दरबारी आपल्या हक्कासाठी एकत्र ताकदीने उभे राहणे गरजेचे आहे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे आवाहन त्यांनी लोहार समाजाच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून समाज बांधवांपर्यंत पोहोचवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२२ जानेवारी रोजी दिल्या जाणाऱ्या या निवेदनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार असून, यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका ठरविण्याचा इशाराही समाज बांधवांकडून देण्यात येत आहे.
Editer sunil thorat



