
हडपसर (पुणे) : (दि. १७) जानेवारी रयत शिक्षण संस्था, कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा यांच्या वतीने आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा–२०२६ चा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार (दि. १७) रोजी एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रश्नमंजुषेला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. उखाणे, म्हणी, कोडी यांमधून प्रश्नोत्तरांची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रश्नमंजूषा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा देते. या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत पोहोचले असून भविष्यातही अनेक विद्यार्थी क्लास वन अधिकारी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे होते. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे या उद्देशाने गेली १९ वर्षे ही राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. एमपीएससी व यूपीएससीसाठी आवश्यक असलेली पायाभूत समज, आत्मविश्वास व प्रश्नसंचाची जाण या स्पर्धेमुळे विकसित होते. राज्यभरातील असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला असून अनेकजण प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. छाया सकटे यांच्या “लोकप्रशासन भाग–२” या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे विजेते…
प्रथम पारितोषिक: इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा
(प्रतिक पन्हाळे, शंतनू पिसाळ)
द्वितीय पारितोषिक: सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड
(ऋतुजा यादव, नेहा जाधव)
तृतीय पारितोषिक: एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर
(तृप्ती दोढमिसे, निरंजन सागर)
उत्तेजनार्थ प्रथम: वाघेरे महाविद्यालय, सासवड
(पूजा कुंजीर, तेजस रासकर)
उत्तेजनार्थ द्वितीय: बळवंत कॉलेज, विटा
(प्रतिक मंडले, प्रफुल्ल जावीर)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ. अतुल चौरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम व डॉ. अर्चना पाटील यांनी केले. या राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून एकूण ५४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Editer sunil thorat



