रांजणगाव परिसरात गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्यांचा साठा जप्त ; २०३ किलो अंमली पदार्थासह तरुण आरोपी ताब्यात…

तुळशीराम घुसाळकर
रांजणगाव (हवेली पुणे) : केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अवैध अंमली पदार्थ व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत रांजणगाव एमआयडीसी परिसरात २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाच्या अंमली पदार्थ मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी एका तरुण आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ५७ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री व साठवणूक रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ही मोठी कारवाई केली.
दि. १० जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना, रांजणगाव हद्दीतील सरकारी दवाखान्याजवळ राहणारा विपुल संदीप विटकर (वय २०, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्या राहत्या घरात तसेच घराजवळील पानटपरीमध्ये गांजा मिश्रित ‘बंटा’ नावाच्या गुंगीकारक गोळ्या बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार तुषार पंदारे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांचे आदेश घेण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा कारवाई केली. या छाप्यात २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ गोळ्यांचा साठा आढळून आला. सदर साठ्याची किंमत ५७ हजार ३५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार तुषार अशोक पंदारे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्यासह पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, राहुल पवार, दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने व विलास आंबेकर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात (रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे) करत आहेत.
Editer sunil thorat



