
नाना पेठ (पुणे) : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आत्मा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असून ही जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विलास कांबळे यांनी केले.
डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय, नाना पेठ येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा व अस्मिता जपली जाते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही केवळ बोलण्याची भाषा नसून ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची व सामाजिक जाणिवांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. जे. के. मस्के, डॉ. नरेश पोटे, डॉ. तेजपाल कांबळे, कार्यालयीन अधीक्षक रीना भोसले, प्रा. महादेवी धारक यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादाराव गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. महादेवी धारक यांनी मानले.
Editer sunil thorat



