
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच हवेली तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूकपूर्व हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्षासाठी नवपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीने लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांतील इच्छुक उमेदवारांसाठी रविवारी (दि. १८) कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपतराव काळभोर यांनी भूषविले. नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्यासह फाउंडेशनच्या कोअर कमिटीचे सदस्य प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्याचा उद्देश कोणत्याही पक्षाच्या राजकारणापेक्षा स्थानिक विकास, सामाजिक समता आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून सक्षम नेतृत्व घडवणे हा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती महिला, लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी इतर मागासवर्गीय महिला, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती असे आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे या गटात सामाजिक समतोल राखणाऱ्या नेतृत्वाची निवड होण्याची संधी निर्माण झाली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यात जिल्हा परिषद गटासाठी सोनम नामुगडे, पूनम गायकवाड व पूजा काळभोर यांनी नवपरिवर्तन पॅनलमधून उमेदवारीची इच्छा जाहीर केली. तसेच पंचायत समिती लोणी काळभोर–वडकी गणासाठी उज्वला महेश फलटणकर व दिपाली घाडगे, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे, राकेश लोंढे, नकुल शिंदे व भगवान साळवे यांनी आपली भूमिका मांडत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्यात उपस्थित नागरिकांनीही आपली मते स्पष्टपणे मांडली. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण, मागासवर्गीय नागरिकांची प्रलंबित घरे नियमित करणे, तसेच कदमवाकवस्ती शिवरस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
या पक्षविरहित मेळाव्यास माजी सरपंच चित्तरंजन काळभोर, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच नासिरखान पठाण, गुरुदेव जाधव, अशोक कदम, मुकुंद काळभोर, सूर्यनारायण काळभोर, माऊली काळभोर, प्रताप कदम, उदय काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी परिसरात निवडणूक चर्चांना नवा वेग मिळाल्याचे चित्र आहे.
Editer sunil thorat





