लोणी काळभोर–कदमवाक वस्ती–वडकी गटातून सौ. शितल सुजीत कांबळे यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची तयारी…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या लोणी काळभोर–कदमवाक वस्ती–वडकी गट क्रमांक ४१ (अनुसूचित महिला प्रवर्ग) मधून सौ. शितल सुजित कांबळे यांनी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. शिक्षण, सामाजिक कार्य आणि प्रशासकीय अनुभवाच्या बळावर त्या मतदारांपर्यंत पोहोचत असून “सत्ता नव्हे, सेवा हाच ध्यास” या भूमिकेतून त्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सौ. शितल कांबळे या बी.ए., डी.एड. शिक्षण घेतलेल्या असून गेली १२ वर्षे त्या नामांकित संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनुभवातून गरीब, कष्टकरी, शेतकरी व गरजू घटकांच्या समस्या जवळून समजून घेण्याची संधी मिळाल्याचे त्या सांगतात. योग्य शिक्षण, मार्गदर्शन व संधी मिळाल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, हा विश्वास त्यांच्या कार्यातून प्रतिबिंबित होतो.
समता, न्याय व बंधुता या मूल्यांवर ठाम विश्वास ठेवत त्या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. अन्यायाविरोधात आवाज उठवणे व वंचित घटकांच्या हक्कांसाठी उभे राहणे ही त्यांची भूमिका असून छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी विचार तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा ही त्यांच्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्या नमूद करतात. लोकाभिमुख, पारदर्शक व प्रामाणिक कारभार करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
प्रशासकीय अनुभवाबाबत सांगायचे झाल्यास, सन २००५ पासून त्या जिजामाता पतसंस्थेत संचालक म्हणून कार्यरत राहिल्या असून बचत, कर्ज, आर्थिक नियोजन व पारदर्शक कारभाराचा त्यांना अनुभव आहे. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत पाणीपुरवठा नियोजन समितीमध्ये काम करताना पाणीपुरवठा नियोजन व अंमलबजावणीचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी मिळवले आहे.
त्यांच्या कुटुंबालाही सामाजिक कार्याची परंपरा लाभली आहे. पती Adv. सुजित प्रल्हाद कांबळे हे विविध सामाजिक व न्याय्य चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतात. तर सासरे प्रल्हाद सिताराम कांबळे यांनी फिलिप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दीर्घकाळ सेवा बजावत कामगार संघटनांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सध्या ते सिद्धार्थ संघ तरुण मंडळ, लोणी काळभोर येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
निवडणूक जाहीरनाम्यात शितल कांबळे यांनी स्वच्छता व पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते व स्ट्रीट लाईट्स सुधारणा, महिलांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांसाठी पीक विमा व सेंद्रिय शेती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, युवकांसाठी रोजगार व कौशल्यविकास तसेच अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी न्याय व विकास या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
“कार्यालयात नव्हे, तर तुमच्या दारात प्रशासन” ही भूमिका घेऊन प्रामाणिक, निःस्वार्थ व सतत उपलब्ध प्रतिनिधी म्हणून काम करण्याची प्रतिज्ञा त्यांनी व्यक्त केली आहे. लोणी काळभोर, कदमवाक वस्ती व वडकी या सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Editer sunil thorat



