महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार? सरकारचा सकारात्मक प्रस्ताव चर्चेत…

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावर सरकारकडून सकारात्मक भूमिका असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सध्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. मात्र, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांचेही सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी कर्मचारी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
25 राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आधीच 60 वर्षे आहे. विशेष म्हणजे देशातील सुमारे 25 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांना 58 व्या वर्षी निवृत्त व्हावे लागत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आधीच 60 वर्षे करण्यात आले आहे. त्यामुळे इतर संवर्गांतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिंदे सरकारकडून आश्वासन, मात्र निर्णय रखडलेला…
भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात प्रस्तावही तयार करून तो विधानसभेत सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
मात्र, काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविल्यामुळे हा विषय पुढे सरकू शकला नाही. फडणवीस सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात या मुद्द्यावर ठोस हालचाल झालेली नसल्याचे चित्र आहे.
सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील कारणे….
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अनेक उमेदवार 30 ते 35 वयाच्या दरम्यान सेवेत रुजू होत असल्याने त्यांचा सेवा कालावधी कमी पडतो.
नवीन पेन्शन योजना या सेवा कालावधीवर आधारित असल्याने काही कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळत नाही. केवळ एक-दोन वर्षांची सेवा कमी पडल्याने अनेक कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहत असल्याची उदाहरणे आहेत.
प्रशासनालाही होणार फायदा…
सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ प्रशासनाला मिळू शकतो. अनुभवी मनुष्यबळामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा दावा कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.
सरकार काय निर्णय घेणार?
राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकार नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याचा धाडसी निर्णय सरकार घेणार का, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
Editer sunil thorat



