अभूतपूर्व गोंधळात यशवंतची वार्षिक सभा ; संचालक मंडळाने सर्व विषय पटलावरून ढकलले…

थेऊर, (पुणे) : पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे मोठ्या गदारोळात पार पडली. गोंधळाच्या वातावरणातच संचालक मंडळाने पटलावरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.
गेल्या काही दिवसांपासून यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीच्या विक्रीसंदर्भात शासनाकडून आलेल्या आदेशानंतर, कृषी उत्पन्न बाजार समिती ही जमीन तब्बल 299 कोटी रुपयांना विकत घेणार असल्याची माहिती समोर आली होती. शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचा विचार करता काही संचालकांनी या प्रक्रियेबाबत भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सभासदांचे लक्ष या सभेकडे लागले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप होते. आपल्या मनोगतात त्यांनी कारखान्याच्या गेल्या 13-14 वर्षांतील घडामोडींचा आढावा घेतला. कारखान्याच्या हितासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. विशेषत: माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयीन लढ्यानंतरच हे संचालक मंडळ कारभार करत असल्याचे ते म्हणाले. सुभाष जगताप यांनी सांगितले की, संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांत मोठा प्रयत्न करून शासन दरबारी कारखान्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधूनच कारखान्याच्या जमीन विक्रीबाबतचा निर्णय झाला. तसेच मंडळाने कारखान्याच्या खर्चात जवळपास 100 कोटी रुपये वाचवले असून, संबंधित बँकांना वन टाइम सेटलमेंटनुसार पैसे दिल्यामुळे आता कारखान्याची जमीन बोजामुक्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषयपत्रिका पटलावर मांडली. प्रत्येक विषय वाचून दाखवला व आवाजी मतदानाद्वारे मंजुरीची मागणी केली. मात्र या टप्प्यावरच सभासदांकडून तीव्र आक्षेप नोंदवले गेले.
कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, मागील सभा केवळ 5-10 मिनिटांत आटोपली, मात्र तिचा इतिवृत्तांत वाचण्यासाठी तब्बल 20-25 मिनिटे लागली. त्यामुळे इतिवृत्तांतातील नोंदी भ्रामक व अमान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, विक्रीसाठी प्रस्तावित जमिनीच्या गट क्रमांकात अहवालातील आकडे व कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या अंडरटेकिंगमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर मोठा गोंधळ झाला. त्यावर अध्यक्ष जगताप यांनी “हे प्रिंटिंग मिस्टेक आहे” असे स्पष्टीकरण दिले. मात्र या उत्तरावर अनेक सभासदांनी हशा पिकवला.
लवांडे यांनी पुढे आरोप केला की, बाजार समितीला विकण्यात येणाऱ्या जमिनीचा दर परिसरातील सद्यस्थितीला अनुसरून नसून, त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच संचालक मंडळ अनेक महत्त्वाच्या बाबी सभासदांपासून जाणीवपूर्वक लपवत असल्याचा आरोपही त्यांनी सभेत केला.
शेवटी, प्रचंड गोंधळ, टाळाटाळ व वादविवादाच्या वातावरणात संचालक मंडळाने पटलावरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतल्याने सभासद नाराज झाले.
Editer sunil thorat




