सुसाईड नोटमध्ये खाकीवरील गंभीर आरोप, गुंड-राजकारणाचं सावट आणि सरकारच्या कायद्यावर प्रश्नचिन्ह!
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या...

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या करून जीवन प्रवास संपवला आहे. या घटनेने केवळ फलटण नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार पदावर कार्यरत असलेली महिला डॉक्टर अशा प्रकारे मृत्यूला कवटाळते, ही समाजासाठी एक वेदनादायी आणि संतापजनक बाब आहे.
हातावर लिहिलेली सुसाईड नोट, खाकी वर्दीवरील थरारक आरोप…
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयुष्य संपवलं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या नोटमध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर लैंगिक अत्याचाराचा, तर हवालदार प्रशांत बनकर याच्यावर मानसिक त्रासाचा गंभीर आरोप केला आहे. “गोपाल बदनेने चार वेळा अत्याचार केला आणि प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिला” असे शब्द त्यांच्या हातावर कोरलेले होते.
या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्र, पोलीस विभाग आणि संपूर्ण समाजात संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे डॉक्टरांचे योगदान कोरोना काळापासून आरोग्य व्यवस्थेच्या पाया म्हणून मानले जाते, आणि दुसरीकडे त्याच आरोग्य सेवकावर अशा अत्याचारांचे आरोप लागतात हे शासनयंत्रणेच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
महिला आयोगाचे हस्तक्षेप, कठोर चौकशीचे आदेश…
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने सातारा पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. आयोगाने हेही स्पष्ट केले की, जर डॉक्टरने यापूर्वी तक्रार केली असेल, तर ती का दडपली गेली? आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई का केली नाही? याचीही सखोल चौकशी होईल.
दरम्यान, फलटण सिटी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2)(N) आणि 108 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेसाठी शोधपथक रवाना केले आहे. मात्र, आता जनतेचा एकच प्रश्न “फक्त गुन्हा दाखल करून प्रकरण थांबणार आहे का? की यावेळी खरोखर न्याय मिळणार आहे?”
‘पर्यटन प्रकरणा’पासून डॉक्टर आत्महत्येपर्यंत, धोक्यात सन्मान आणि सुरक्षितता…
राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटन क्षेत्र, शासकीय सेवा, वैद्यकीय व्यावसाय कुठेच सुरक्षितता उरलेली नाही.
गुंडगिरी, खाकी आणि राजकारण यांचं अदृश्य जाळं प्रत्येक घटनेत दिसू लागतंय. फलटण प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आज गुन्हेगार केवळ रस्त्यावर नाहीत, तर सत्ता आणि गणवेशाच्या संरक्षणातही आहेत.
सरकार आणि प्रशासनावरील प्रश्न, कठोर कायदा कधी येणार?
राज्य शासन आणि प्रशासनाने या घटनेतून काही शिकणार का, हा प्रश्न आज जनतेतून मोठ्या प्रमाणावर विचारला जातोय. महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक घोषणा, योजना आणि अभियानं सुरू आहेत, पण त्याच वेळी व्यवस्थेतील अन्याय, दबाव आणि मानसिक छळ वाढतो आहे.
सरकारकडे आज समाजाचा थेट प्रश्न आहे…
—महिलांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा कधी आणला जाणार?
—अशा प्रकरणांवर फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होणार का?
—आणि सत्ताधाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली गुन्हेगार वावरत असतील तर त्यांना रोखणार कोण?
समाज आणि डॉक्टर समुदायाचा आक्रोश…
राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी या प्रकरणावर तीव्र निषेध नोंदवला आहे. “डॉक्टर उपचारासाठी जगतात, पण न्यायासाठी मरतात” अशी भावना आता डॉक्टरांमध्ये पसरली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदे, हेल्पलाइन आणि पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडूनही निषेध व्यक्त केला जात असून, सरकारने तातडीने ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे.
पुन्हा एक ती… पुन्हा एक बळी, आता तरी सरकार जागं होईल का?
फलटण प्रकरण ही केवळ एका डॉक्टरची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेला, प्रत्येक सेवकाला, प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीला धोक्याची घंटा आहे.
आधी गुंड, नंतर खाकी आणि आता राजकारण या सगळ्यांच्या संगनमताने सत्य दाबलं जातं, न्याय थांबतो आणि निरपराध बळी पडतो.
आता सरकारसमोर एकच प्रश्न आहे
👉 “आता तरी ती शेवटची ठरावी, यासाठी काय करणार?”
👉 “भविष्यात अशा डॉक्टर, अधिकारी आणि महिलांचा बळी जाणार नाही याची खात्री कोण देणार?”
जनतेला आता चौकशी नव्हे, तर कारवाई आणि उदाहरणार्थ शिक्षा अपेक्षित आहे. फलटणची घटना हा केवळ आत्महत्येचा प्रसंग नाही ती संपूर्ण व्यवस्थेवरचा आरोप आहे. आता या व्यवस्थेने उत्तर द्यायची वेळ आली आहे.
Editer sunil thorat



