मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी व मारहाण; कोथरुड व संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिस आयुक्तालयासमोर दिवसभर आंदोलन…

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यात आलेल्या पोलिसांसह कोथरुड पोलिसांनी पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी केली आणि त्यांच्यावर मारहाण केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दोन दिवसांपासून केली जात आहे. मात्र, पुणे पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
या प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित पीडित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर धरणे आंदोलन करत बसून होते. तरीही पोलिसांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडून झालेल्या अघोषित दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त केला.
“कोथरुड व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शब्दांचा वापर करत मारहाण केली, हे फक्त दुर्व्यवहार नाही तर जातीय अत्याचार आहे. अशा पोलिसांवर तत्काळ अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी आमदार रोहित पवार, प्रशांतदादा जगताप, अंजलीताई आंबेडकर, सुजातजी आंबेडकर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा व अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन दिले असले तरी, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
“संबंधित व्हीआयपी केस कोणती आहे, त्यामध्ये दबाव कुणी आणला? संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? आणि या प्रकरणात सहभागी असलेली झिरो पोलिस महिला कोण? याचा तपास होऊन कठोर कारवाई झालीच पाहिजे. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Editer sunil thorat






