
लोणीकंद–पेरणे (हवेली) : प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित नागपूर दीक्षा भूमी यात्रेला पेरणे येथील गोल्डन पॅलेससमोरून भव्य प्रस्थान मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील आंबेडकर अनुयायी तसेच विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यात्रेचे स्वरूप अधिक भव्य बनवले. यात्रेच्या प्रस्थान सोहळ्यात पुणे–हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रविंद्र नारायण कंद यांनी पै.किरण साकोरे यांच्या सर्व समाज, जाती–धर्मांना एकत्र घेऊन जाणाऱ्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, काशी–अयोध्या यात्रेनंतर आता नागपूर दीक्षा भूमी यात्रेचे आयोजन हा अत्यंत प्रशंसनीय उपक्रम असून नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी देणे ही अत्यंत सामाजिक बांधिलकीची बाब आहे.
२१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता यात्रेला सुरुवात झाली. भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, बुद्ध वंदना आणि पुष्पहार अर्पण करून यात्रेला पवित्र सुरुवात देण्यात आली. “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यात्रेसाठी ट्रॅव्हल बसेस, भोजन व्यवस्था, निवास, वैद्यकीय मदत, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा अशा सर्व सोयींची परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. आंबेडकर अनुयायी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या यात्रेचे आयोजन आमदार ज्ञानेश्वर कटके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, पै.संदीप भोंडवे, चेअरमन सुभाष जगताप, ज्ञानेश्वर वाळके, रविंद्र कंद, शंकर भुमकर, संजीवनी कापरे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रस्थान सोहळ्यास श्रीकांत कंद, सुनील वागस्कर, भाऊसाहेब झुरुंगे, बापूसाहेब शिंदे, ओंकार कंद आदी मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेला शुभेच्छा दिल्या.
यात्रेबाबत प्रतिक्रिया देताना फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर म्हणाले की, प्रदिपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पै.किरण शेठ साकोरे यांनी यात्रेची अत्यंत उत्कृष्ट तयारी केली आहे. काशी–अयोध्या यात्रेसारखीच दीक्षा भूमी यात्राही नियोजनबद्ध झाली असून यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय न होण्यासाठी सर्व सोय पूर्णत्वास नेण्यात आली आहे. नागरिक समाधानी असून किरण शेठ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
ही यात्रा सामाजिक ऐक्य, बंधुभाव, समता आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करणारी ठरली असून प्रस्थानाच्या वेळी जमलेल्या जनसमुदायामुळे लोणीकंद–पेरणे परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
Editer sunil thorat





