
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : भाडेकरू ठेवताना पोलीसांना माहिती देणे बंधनकारक असताना तब्बल १७ भाडेकरूंची माहिती दडवून ठेवणाऱ्या घरमालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल रामदास काळभोर (रा. कांचन गिरी मठाजवळ, लोणी काळभोर) असे या घरमालकाचे नाव असून पोलीस हवालदार बापू वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलमानुसार घरमालक व खाजगी नियोक्त्यांनी भाडेकरू व नोकर यांच्या माहितीची नोंद पोलीसांकडे देणे अनिवार्य असल्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही प्रक्रिया नियमितपणे प्रसारमाध्यमांद्वारे कळवूनही अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या अलीकडच्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. हॉटेल, लॉज, गर्दीची ठिकाणे, मर्मस्थळे व भाडेकरूंविषयी माहिती घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
याच दरम्यान १९ नोव्हेंबर रोजी अफसर अहेसान अन्सारी नावाच्या व्यक्तीकडे ब्राउन रंगाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) आढळून आला. अधिक चौकशीत त्याचे वास्तव्य ‘काळभोर हाइट्स’ परिसरात भाडेतत्त्वावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या इमारतीची तपासणी केली असता घरमालक विमल काळभोर यांनी त्यांच्या इमारतीत एकूण १७ भाडेकरू राहात असल्याची माहिती समोर आली. मात्र या सर्वांची अनिवार्य माहिती पोलीसांना न देता त्यांनी पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा), पुणे शहर यांनी जारी केलेल्या आदेशांचे जाणूनबुजून उल्लंघन केले असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, स्वप्नील बट्टेवार, चंद्रकांत मोडक, गणेश कांबळे, राहुल सावंत, फिरोज खान, राकेश जाधव, इम्रान मनियार, रवि खोकर, रोहित खरे, माहिर अन्सारी, समाधान तावले, लखन खोकर, नंदा लांडगे, मारुती इंगळे, विजय सोनकांबळे, फिरोज कबीर आणि महेश अंबुसे हे १७ व्यक्ती या इमारतीत भाडेतत्त्वावर राहत होते. मात्र याबाबत पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले.
या गंभीर निष्काळजीपणाबद्दल घरमालक विमल रामदास काळभोर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आवाहन केले की, ज्या घरमालकांकडे भाडेकरू राहतात, तसेच खाजगी मालक जे नोकर ठेवतात, त्यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३(३) नुसार संबंधितांची माहिती पोलीसांकडे त्वरित सादर करावी. हे कायदेशीर तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार रवि आहेर, संदीप जोगदंड आणि बापू वाघमोडे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास सुरू असून पोलिसांनी परिसरातील सर्व घरमालकांना नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Editer sunil thorat



