
तुळशीराम घुसाळकर
थेऊर (ता. हवेली) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर येथे आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवी काकडे यांच्या उपक्रमातून आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पेशवेवाडा परिसरात भरलेल्या या शिबिरात तब्बल १,७७० पेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावून आरोग्यसेवांचा लाभ घेतला.
शिबिरात १,२६० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८२० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. तर ४० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता निदान झाली असून येत्या काही दिवसांत या सर्वांची मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याचे आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले. याशिवाय ३ नागरिकांना मोफत कृत्रिम हात व पाय देण्यासाठी नोंदणी करण्यात आली.
महाआरोग्य शिबिरात हृदयविकार तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता चाचणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब–शुगर चाचणी, कान-नाक-घसा तपासणी अशा विविध एकाच छताखालील आरोग्यसेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमामुळे थेऊर परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळाल्याने काकडे दाम्पत्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Editer sunil thorat




